केतकरांच्या लोकसत्तामधील  'मुझको भी तो लिफ्ट करा दे' या वैचारिक लेखातून खालील जिब्रान च्या 'मी वेडा कसा झालो' या कथेची आठवण झाली. जिब्रान ने आपले सामाजिक मानसिक मुखवटे चोरी गेल्यानंतर त्या चोराचे आभार मानले कारण जीब्रानला कळले कि मनुष्य हा स्वप्रतीमेत जगत असतो. जिब्रान संमोहनमुक्त झाला. ही त्याने व्यक्तिगत पातळीवर केलेली वैचारिक क्रांतीच होती.

मनुष्य सतत, 'आपण स्वत:मध्ये कुणीतरी आहोत' हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतो. पण मुळात आपण जे असतो तेच दिसतो. जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न केवळ ढोंगच असते. त्याची महत्वकांक्षा उच्च सामाजिक स्तर प्राप्त करण्याची असते. यामागे त्याची सामाजिक सुरक्षितता कारणीभूत असते. म्हणजेच मनुष्य सतत असुरक्षित जगत असतो व त्याच्या जीवनाचे उद्दिष्ट 'सुरक्षित जीवन' असे बनते. अशी मानसिकता तयार करणे म्हणजे स्वत:चे अधोगमन करणे आहे हे लक्षात यायला जाणीवेच्या  पातळी चा स्तर उंचावणे गरजेचे होऊन बसते. कारण मनुष्य जेवढा सुरक्षित असतो तेवढा तो स्वत:च्या प्रगतीला बाधक असतो. म्हणूनच नित्शे हा विचारवंत  'लिव्ह डेन्जरसली'  असे सांगतो,
 
खरी पावर सामाजिक प्रतिष्ठे मध्ये शोधणे म्हणजे वाळवंटात हिरवळ शोधण्यासारखे आहे. आपण मानसिकदृष्ट्या किती ताकदवान आहोत याचे उत्तरच 'खरी पावर' आहे. मात्र आपण सामाजिक मनात इतके गुंतून जातो कि आपल्याला वैश्विक मनाची (शून्यत्वाची) किंचितही जाणीव नसते. हे आपल्या मानसिकतेचे खच्चीकरण ठरते.  केतकरांचे याबाबत चे वर्णन रास्त आहे, मुळात वर्ग निर्मिती ही समाज मनाच्या स्तरातून  होते. आणि कम्युनिझम सर्व प्रश्नांचे  उत्तर नाही, कम्युनिझम फक्त भौतिक साधनांची समविभागणी करतो मात्र व्यक्तीच्या 'प्रतिष्ठायुक्त  आसक्ती' मुळे निर्माण होणा-या  मानसिक वर्गाला  कम्युनिझम खतपाणी घालण्याचे काम करतो. म्हणजे एक वर्ग जाऊन  दुस-या नव्या वर्गाची निर्मिती होते.  चीन, रशिया  आणि फ्रेंच राज्यक्रांत्या फोल होण्याचे हे एक मानसिक कारण असू शकते. कारण 'जीलास' यांच्या तार्किक शोधानुसार 'खासगी संपत्तीवर आधारलेली भांडवली व्यवस्था घालवून टाकल्यानंतरही मानसिक विषमता असणे हीच नवी विकृती' हे मान्य करावे लागते.
 
भारताच्या बाबतीत 'जात' प्रथम व 'वर्ग' नंतर अशी अवस्था आहे. इथे 'जात्यंतक स्त्रीदास्य व्यवस्था' प्रथम आहे. कारण कोणत्याही क्रांतीची सुरुवात जाणीवेपासून होते व जात ही जाणीव आहे. म्हणून सामाजिक क्रांती 'जातमुक्ती' देवू शकत नाही. इथे वैचारिक बदल अपेक्षित आहेत. बाबासाहेबांनी शिक्षणाला इतके महत्व यासाठीच दिले आहे. 


Like it on Facebook, Tweet it or share this article on other bookmarking websites.

No comments