नैतिकता म्हणजे धर्म आहे का - फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण नेहमीच असे समजले जाते की नैतिकता म्हणजे धर्म होय! सामाजिक परंपरेनुसार नीतीचा अर्थ काय होतो तर व्यभिचार न करणे, इतरांविषयी वाईट न चिंतने, इर्षा न बाळगणे वैगरे .. ह्या सामाजिक नीती नियमांची अंमल बजावणी करणे म्हणजे धर्माचे पालन करणे असे मानले जाते. पण खरोखरीच धर्माचा अर्थ एवढा क्षुद्र आहे का?  धर्म म्हणजे जीवन जगण्याची कला होय आणि ह्या धर्मातूनच नैतिकतेचा जन्म होत असल्यामुळे नैतिकता ही धर्माची अभिव्यक्ती बनते. ही नैतिकता एका अर्थाने सामाजिक आवश्यकता बनल्याने समाजात मानवाचे मुल्य कमी होऊन नीती महत्वाची ठरते. असा समाज मानवाला जसा आहे तसा म्हणजे वास्तविक रित्या समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. अशा समाजात मनुष्याचे सामाजिक संबंध त्याच्या आचरणा  पलीकडे नसतात. आचरण चांगले असल्याने वस्तुत: कोणी चांगले ठरत नाही. कारण आचरण हे कृतीवरून नाही तर मनावरून ठरत असते. आचरण जर मनावरून ठरवायचे असेल तर त्यासाठी आत्मशुद्धी (मानसिक क्रांती) आवश्यक आहे. मनुष्याच्या आत्मशुद्धीतून, त्याच्या निर्मल मनातून जे व्यक्त होईल ते नैतिक असेल, चांगले असेल. पण जी नीती प्रयत्नातून निर्माण  होईल ती मुलत: अनितीच असेल.
                           परंपरेनुसार धर्माची अशी व्याख्या केली जाते की, 'जी (समाजाची) धारणा करतो तो धर्म' अशा पारंपारिक अपरिवर्तनीय धारणा परिवर्तनीय जीवनामध्ये कुचकामी ठरत असल्यामुळे नैतिकता ही सहज आणि अपरिवर्तनीय असली पाहिजे.
                           खराधर्म जाणून घेण्यासाठी माणसाच्या जाणिवेत अमुलाग्र क्रांती झाली पाहिजे. स्वत:च्याच जाणिवेचा शोध घेत अमुलाग्र परिवर्तन घडले तर धर्मशील मन ही वस्तुस्तिथी बनते. ते मन मग एका व्यक्तीचे नसते, ते फक्त धर्मशील मन असते. अमर्याद अपरिमित असे ते पकडू शकते. धार्मिक मनुष्य जीवनातील आव्हाने सहजतेने स्वीकारून त्याचा सामना करतो. अशा जीवनाचा विचार म्हणजेच धर्माचा विचार होय. धार्मिक मनुष्य जीवनाच्या एकाच साच्यात जगात नाही तर संपूर्ण जीवन जिवंत पाने जगतो. धर्म तर एक  गुण आहे , गुणवत्ता आहे.
                           खरा धार्मिक मनुष्य हा केवळ नैतिक आचरणात संतुष्ट होत नाही तर या अनंत विश्वातील गूढ सत्य शोधून काढण्याचाही निश्चय त्याच्या ठिकाणी असतो. नीती निष्ठेबरोबरच आपल्या मनात वसत असलेल्या नैतिक थोरवीचा उगम म्हणून ईश्वराबद्दल आदर वाटतो  त्याचप्रमाणे आकाशातील ता-यांचा, सर्व निसर्गसौंदर्याचा उगमही तोच म्हणून त्याबद्दल आत्यंतिक प्रेम व कुतूहल वाटते. सारांश, केवळ नितीनिष्ठेहून व्यापक व जीवसृष्टीच्या गूढ तत्वाची जिज्ञासा, तिच्या अनंत तत्वाबद्दल व सौंदर्याबद्दल निरपेक्ष आनंद व कुतूहल उचंबळून राहिलेले आहे अशी मन:प्रवृत्ती हीच ख-या धार्मिकतेची निशाणी होय. धार्मिक मनुष्य जसा सत्यनिष्ठ व सौंदर्यनिष्ठ तसाच तो नितीनिष्ठसुद्धा असल्यामुळे तो आपले सत्यशोधन अगर सौंदर्यसेवन नीतीला अनुसरूनच इतर सर्व प्रकारच्या उन्नतीस वाव देतो. आपल्या नैतिकतेला अनुसरून सर्व प्राणिमात्रांची उन्नती करण्याचा प्रयत्न करणारा, आपल्या सत्यनिष्ठतेच्या जोरावर सर्व विश्वाचे गूढ उकलू पाहणारा व त्याच्या अनंततत्वाची थोरवी गाण्यात तन्मय होऊन जाणारा असा मनुष्यच खरा धार्मिक समजला पाहिजे. अशा मनुष्यास धर्मनिष्ठा व नीतीनिष्ठा यात विरोध दिसत नाही. शेवटी धार्मिक होण्याचा प्रश्न आहे, धार्मिक दिसण्याचा नाही. धार्मिक होण्याचे आवरण दुस-यासाठी  आहे स्वत:साठी नाही. दुस-याच्या दृष्टीकोनातून स्वत:ला पाहण्यापेक्षा स्वत:च्या दृष्टीकोनातून स्वत:ला पाहणे योग्य ठरेल. याचा अर्थ स्वत:ला वास्तविकरीत्या पाहिले पाहिजे. हा प्रश्न असत्य हिंसा आणि भय यांना दूर सारण्याचा नाही तर अज्ञानाला दूर सारण्याचा आहे. 
                            धर्म तर मनाला जिंकण्याचा उपाय आहे. धर्मातून जेव्हा विधायकता नाहीशी होते, तेव्हा धर्म फक्त निषेधात्मक आदेशांचे संकलन होऊन बसतो. आणि धर्माचे असे निषेधात्मक स्वरूप म्हणजे नीती होय. नीती धर्माचं पतन आहे. नीतीचा अर्थ आहे नकार. सोडने आणि त्यागने नीतीचे प्राण आहेत. धर्म नकारात्मक नाही तर विधायक आहे. धर्माचं स्वरूप वस्तुनिष्ठ नाही व्यक्तीनिष्ठ आहे.
                           धर्म नकारात्मक कसा असू शकतो? धर्मानुभूती तर नेहमीच विधायक असते. पण जे त्याला जाणत नाहीत व जगत नाहीत, त्यांच्या दृष्टीकोनातून ती नेहमी नकारात्मकच राहते. अशा रितीने नैतिकता म्हणजे जागृत व्यक्तीच्या जीवनशैलीचे नाव आहे.   


Like it on Facebook, Tweet it or share this article on other bookmarking websites.

No comments